शासकीय योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना पत्र
भंडारा : प्रधानंमत्री पीक विमा योजना आणि पीएम किसान योजने अंतर्गत मिळणारा सन्मान निधी व इतर शासकीय योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या रक्कमेतून बँकांनी कर्जाची रक्कम कपात करू नये असे पत्र जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी सर्व बँकांना दिले आहे. नागपूर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला त्यावेळी बँकांना लेखी निर्देश देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २० डिसेंबर २०१९ बँकांना पत्र पाठविले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना व इतर शासकीय योजनेच्या शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांचे कर्जाची रक्कम वजा करण्यात येवू नये असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हयाच्या आढावा बैठकीत दिले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंदन यांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक तसेच तहसिलदार यांना सुचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या शासकीय योजनेच्या रकमेतुन कर्जाची रक्कम वजा करण्यात येवु नये असे स्पष्ट निर्देश बँकांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी निर्देंशांबाबत बँकांना सूचित करण्यात आले असून योजनांच्या लाभाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यातून कर्जापोटी कपात करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक अ. स. कुंभलकर यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे व याबाबत कुठलीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असा आदेश संदेश कुंभलकर यांनी बँकांना दिला आहे.
No comments: