"सुमन" प्रकल्प : सुरक्षित मातृत्वासाठी आता गोंदिया जिल्ह्यात सुरू
'सुमन’ प्रकल्पासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालय व सालेकसाच्या ग्रामीण रुग्णालयाची निवड
गोंदिया । केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे महिला व नवजात शिशुसाठी आता नाविन्यपूर्ण महत्वाकांक्षी प्रकल्प ‘सुमन’ सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती अर्बन माता बालसंगोपन अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली आहे.
याबाबत नुकतेच वीसीच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यात आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. ‘सुमन’ प्रकल्पासाठी गोंदिया जिल्ह्यातून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व ग्रामीण रुग्णालय सालेकसा यांची निवड करण्यात आली आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलताना डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, बाळंतपणात होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी व सुरक्षित मातृत्वाची हमी घेण्यासाठी गोंदियासारख्या आदिवासी व दुर्गम क्षेत्रात नक्कीच फायदेशीर ठरेल.
जिल्हा गुणवत्ता अभिवचन समिती या ‘सुमन’ मॉडेलवर देखरेख करणार असून नियमित अससेसमेंट करणार आहे. 24×7 तज्ञांमार्फत सुरक्षित मोफत बाळंतपण व अत्यावश्यक शस्त्रक्रिया, असे याचे स्वरूप आहे. यात प्रशिक्षित BEMOC व CMOC या प्रसूती तज्ज्ञांचा सहभाग घेतला जाणार आहे. महिलांना मोफत सुलभ प्रसूती सेवा मिळण्यास अडचण आल्यास 104 कॉल सेंटरद्वारे तक्रार नोंदणी कॉल करता येणार असून तात्काळ राज्य पातळीवरून समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. यात प्रसूती रुग्ण महिलेकडे व सोयीसुविधेकडे दुर्लक्ष करण्याऱ्याबाबत अजिबात सहिष्णूता खपऊन घेतली जाणार नाही, अशी माहिती अर्बन माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सुवर्णा बुबेकर यांनी दिली.
टास्क फोर्स व सुकाणू समितीची होणार स्थापना
लवकरच याबाबत जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच ब्लॉक लेवलवर नियंत्रण करण्यासाठी तालुका सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सुरक्षित मातृत्वाची हमी घेण्यासाठी आता ‘सुमन’च्या माध्यमातून गोंदिया जिल्हा तयारीस लागला आहे.
No comments: