Breaking

गोंदिया - पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा पशुपालकांनी लाभ घ्यावा 28 जूनपर्यंत अर्ज मागविले

गोंदिया ।  जिल्ह्यात सन 2021-22 या आर्थिक वर्षात मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर 2 देशी/संकरीत गाय गट आणि 20 शेळ्या व 2 बोकड वाटप करणे ही राज्यस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्ह्यामध्ये सर्व प्रवर्गासाठी सरसकट 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.सदरचे 50 टक्के अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहामहिन्यात उर्वरित 25 टक्के थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. योजनेमध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के दिव्यांग लाभार्थींना प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थीकडे स्वत:च्या मालकीचा गोठा तथा जमीन/जागा असणे आवश्यक आहे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थीने यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला असल्यास लाभ घेतल्याचे दिनांकापासून 5 वर्षाच्या आत त्याच लाभार्थ्यास दुबार लाभ देण्यात येणार नाही.तालुकास्तरीय पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांचेकडे सदर योजनेचा अर्ज उपलब्ध आहे.शेतकरी बांधवांनी पंचायत समितीमध्ये जावून सदर अर्ज नमूना प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचेकडे 28 जून 2021 पूर्वी जमा करावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीची निवड झाल्यानंतर निवड आदेश प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाच्या आत गाय गटाची खरेदी करणे आवश्यक राहील.असे न केल्यास गटाची खरेदी न करणाऱ्या लाभार्थीचा अर्ज एक नोटीस देवून रद्द करण्यात येईल व प्रतिक्षा सुचीवरील लाभार्थीस या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. गाय गटाची खरेदी लाभार्थीच्या पसंतीने परराज्यातून करण्यात येईल.शेळीगट वाटप योजनेअंतर्गत लाभार्थीकडे वाडा बांधकामाकरीता व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौ.फुट स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. शेळी गटाची खरेदी लाभार्थीच्या पसंतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरुन किंवा स्थानिक प्रचलीत बाजारातून करण्यात येईल.शेतकऱ्यांनी शेळी गट खरेदी पुर्वी वाडा (गोठा) बांधकाम पूर्ण करावे. योजनेअंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे दुग्धव्यवसाय व शेळीपालन विषयक प्रशिक्षण आयोजित करुन त्यांना व्यवसायाकरीता प्रशिक्षीत करण्यात येईल. लाभार्थीने हा व्यवसाय किमान तीन वर्षे करणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.योजनेचा अर्ज करण्याकरीता अंतिम तारीख 28 जून 2021 आहे. सदर योजनेबाबत अधिक माहितीसाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा जिल्ह्यातील पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा. कोरोना काळात ज्या गरीब शेतकरी कुटूंबामध्ये कर्त्या पुरुषाचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला असल्यास अशा कुटूंबास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.अरविंद शंभरकर यांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.