Breaking

मुंडीपारच्या आदिवासी गोवारी समाजांनी दिला जुन्या परंपरेला उजाळा

दिवाळी पाडवा गाय गोधन ढाल पूजन उत्साहाने केला साजरा

गोरेगाव:-तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडीपारच्या आदिवासी गोवारी समाज- बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिवाळी गाय गोधन व ढाल पूजन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करून आपल्या जुन्या परंपरेला उजाळा दिला

गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार 

या गावात आदिवासी गोवारी समाज मोठ्या प्रमाणात असून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपली संस्कृती रीतीरीवाजाप्रमाणे गाय गोधन व ढाल पूजन उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.पण यावर्षी सुर्यग्रहण असल्यामुळे परंपरेनुसार आदिवासी गोवारी समाज संघटना मुंडीपार शाखेच्या वतीने बाजारचौक आखरटोली येथे 14 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पुजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय हा गावातील मालकांच्या गाई चारणे हा असून चराईसाठी जंगल परिसरात घेऊन गेले असता गाईगुरांचे संरक्षण व्हावे म्हणुन वाघोबा देवाची व नागोबा देवाची पूजा करण्याची परंपरा आहे.

आदिवासी गोवारी समाजाचे धर्मगुरू पहांदी पारी कुपार लिंगो पुरुष प्रतीक दोन मुखी ढाल व माता रायताड जंगल स्त्री प्रतीक चार मुखी ढाल हे प्रथम पूर्वज असून त्यांनी समाजाची निस्वार्थपणे सेवा करण्यासाठी दिलेला मंत्र म्हणजेच "जय सेवा" असल्याचे सांगण्यात येत आहे दिवाळीच्या पाडव्याला आखरावर खिल्ल्या मुठवा देवाचे प्रतिक गायगोधनाची स्थापना करुन याठिकाणी दोन्ही ढालीचे पुजा पाठ उत्सव सामुहिकरित्या साजरा करण्याची परंपरा आहे.

दरम्यान आखरावर घोण्याळ गवताचे गोधन बांधुन जवळपास शंभर मिटर परिसरात गवत पसरविल्या जाते.गोधनाखाली कोंबडीचे अंडे किंवा पिल्लु ठेवून समाजाचा प्रमुख पुजारी पुजा पाठ करित असतो.यावरुन संपूर्ण गावातील शेकडो गायी-गोरे नेली जातात.मात्र गोधनाखाली ठेवलेली अंडे अथवा पिल्लु फुटत नाही.यावरुनच घोण्याळ या गवतापासुन गाय गुरांचे संरक्षण होत असल्याचा पुर्वी पासुनच समज असल्याने गावातील काही गुरे मालक गवताचे पुतळे तयार करुन गायगुरांचे रोगराई पासुन संरक्षण व्हावे याउद्देशाने गवताचे पुतळे गोठ्यात बांधुन ठेवण्याची परंपरा आजही तेवढ्याच विश्वासाने जोपासली जात आहे.

गायगोधन सुटल्यानंतर गावामध्ये दोन्ही ढालीचे वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते.दरम्यान आदिवासी गोवारी समाजांची मुले,मुली, स्त्रिया व पुरुष डफल्याच्या तालावर पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करतात ही परंपरा मुंडीपारच्या आदिवासी गोवारी समाजाने सातत्याने जोपासुन आपल्या जुन्या रुढी परंपरेला यावर्षी देखील तेवढ्याच उत्साहाने साजरा करुन उजाळा दिला आहे.

 यावर्षी आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धेच्या स्वरुपात गौमातेला उत्तम सजावट केलेल्या मालकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

महिला आदिवासी गोवारी समाज संघटना कडुन प्रथम क्रमांक बुधराम शहारे यांच्या गौमातेला 1000 रुपयांचे पारितोषिक सरपंच सौ.प्रेमलता राऊत यांच्या हस्ते देण्यात आले. 

आदिवासी गोवारी समाजाचे अध्यक्ष मनीराम राऊत यांच्या कडुन द्वितीय क्रमांक उत्तम राऊत यांच्या गौमातेला 700 रुपयांचे पारितोषिक माजी तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी यांच्या हस्ते देण्यात आले.

आदिवासी गोवारी समाजाचे मार्गदर्शक नामदेव नेवारे यांच्या कडुन तृतीय क्रमांक राजु पारधी यांच्या गौमातेला 500 रुपयांचे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते छबनराव बोमले यांच्या हस्ते  देण्यात आले.

आदिवासी गोवारी समाजाचे सचिव रामेश्वर राऊत यांच्या कडुन चतुर्थ क्रमांक आसाराम राऊत यांना उपसरपंच बी.जी.कटरे सर यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला सरपंच सौ.प्रेमलता राऊत, उपसरपंच बी.जी.कटरे,तंमुस अध्यक्ष शंकर बिसेन,पोलीस पाटील विलास सिंदींमेश्राम,

माजी आरो बी.एस.राहांगडाले,

माजी तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी तसेच गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

या कार्यक्रमाला यशस्वीरित्या 

पार पाडण्यासाठी आदिवासी गोवारी समाजाचे अध्यक्ष मनीराम राऊत, सचिव रामेश्वर राऊत, मार्गदर्शक नामदेव नेवारे,युवा आदिवासी गोवारी समाजाचे अध्यक्ष एकनाथ शहारे, सचिव राहुल राऊत, मार्गदर्शक रामेश्वर शहारे,

महिला आदिवासी गोवारी समाजाच्या अध्यक्ष उषा राऊत, सचिव रिना शहारे, मार्गदर्शक निर्मला नेवारे तसेच आदिवासी गोवारी समाजाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नारायण भिमटे यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.